सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत

 
नंदीचे दर्शन

दरवर्षी आपण श्री उत्तेश्वराच्या यात्रेला जातो आणि देवाचे दर्शन घेतो. तसेच मंदिराच्या मध्य भागी असलेल्या नंदीच्या मुर्तीचे पण दर्शन घेतो.. मात्र नंदीचे दर्शन घेताना आपण नंदीच्या गळ्यामध्ये असलेल्या लहान मुलाचे, ढोल वाजवत असलेल्या चित्राकडे दुर्लक्ष करतो. कारण आपल्याला त्या नंदीच्या गळ्यातील मुलाबद्दल काहीच माहिती नाही. मात्र आज आपण माहिती करून घेऊ.

इ. स. १६०० ते १७००.. वाळणे गावच्या डोंगर माथ्यावर श्री उत्तेश्वर मंदिराच्या पायथ्याशी नाचनी, वरी, काटळी या पिकांची शेती केली जायची. असच एक 'वरी' या पिकाच भल मोठ शेत ४ ते ५ गावातील लोकांनी मिळून केल होते. शेतामध्ये वरीचे पिक जोरात आणि कसदार आले होते. तसेच गवत ही खुप झाले होते आणि ते गवत काढण्यासाठी (बेननी) शेताची मशागत करण्यासाठी सर्व लोक जाणार होते.

आश्विन महिना होता. शेतामध्ये काम करताना जोश, उत्साह यावा म्हणून 'ढोल' वाजवला जायचा आणि त्या ढोलाच्या आवाजावर लोक शेतात काम करायचे. मात्र ते ढोल वाजविण्याचे काम गावातील एक 'घडशी' करायचा त्या मोबदल्यात त्याला गावतील लोक थोडे थोडे धान्य देत असत. त्या घडशाचे नाव "धोंडया घडशी" होते.

शेतामध्ये मशागत (कामगत) करण्याचा दिवस ठरला. शेतामध्ये ढोल चांगला वाजावा म्हणून धोंडया घडश्याने ढोल ही बनऊन घेतला. शेतामध्ये 'कामगती' साठीचा दिवस उजाडला बहुतेक लोक शेतामध्ये पोहचलेही होते आणि हा हि जाण्यासाठी निघनार एवढ्यात त्याला निरोप मिळाला की तुला सातारच्या राजवाडयात बोलावले आहे.

काय करावे काहीच सुचत नव्हते. शेतामध्ये पण जाणे गरजेच होते, आणि राजाकडे ही जाणे तितकच महत्वाच् होते. बापाने आपल्या १० ते १२ वर्षाच्या मुलाला झोपेतून उठविले आणि बोलला की बाळा तुला ढोल वाजविण्यासाठी शेतात जावे लागेल. वडिलांनी लोकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी मुलगा ही शेतात जाऊन ढोल वाजवण्यासाठी तयार झाला. वडील बोलले मी लवकरच परत येतो तोपर्यंत तू ढोल वाजव. मुलगा हा म्हणाला आणि शेताकडे निघाला आणि वडील ही साताऱ्याला निघाले.

मुलगा शेतात पोहचला. मुलाला पाहून शेतातील काम करणारे लोक बोलले, तुझा बाप नाही आला आणि तु दिवसभर ढोल कसा वाजवशील. मुलगा बोलला बाबा साताऱ्याला गेलेत त्यांना राजवाडयात बोलावले आहे मी ढोल वाजवीन .. मुलाने ढोल कंबरेला बांधला आणि वाजवीण्यास सुरवात केली. शेतात लोक ही जोशात काम करत होते. सकाळ पासून ढोल वाजवून मुलगा थकत चालला होता. मात्र सूर्य मावळतीला जाईपर्यंत शेतातील काम बंद होणार नव्हते आणि तोवपर्यंत ढोल वाजवावा लागणार होता. मुलगा ही खुप थकला होता. मात्र तरी ही तो ढोल वाजवतच होता. दिवस मावळतीला चालला होता, आता मात्र मुलगा खुपच थकला आणि ढोल वाजवत वाजवत ढोलातुन आवाज काडू लागला.. " बाबा तुम्ही लवकर या मी खुप दमलोय मी मरणार" असा आवाज तो ढोलातुन काढू लागला. वडील साताऱ्यातून निघाले होते मेढ्यातुन वरती डोंगराने 'मांटी मुरा' येथे पोहचले होते. खिंडीतून पलीकडे आल्यावर बापाच्या कानावर ढोलाचा आवाज पडला "बाबा तुम्ही लवकर या मी दमलोय मी मरणार" सारखा हाच आवाज एकूण बापाला कळले की हा माझाच मुलगा ढोल वाजवत आहे. आता मात्र बाप खुपच कासावीस झाला. लवकर तरी पोहचणार कसा मुलगा कोयना नदी च्या पलीकडे तर बाप सोळशी नदीच्या पलीकडे.

काहीही करून बापाला पोहचायचच होत. बापाने दोनी हाताच्या मुटी घट्ट केल्या आणि डोंगराने खाली धावत सुटला.. धावत धावत तो सोळशी नदी च्या काठावर पोहचला तर वळवाच्या पावसाने सोळशी भरून वहात होती. कशी तरी सोळशी पार केली आणि फुढे धाव घेतली.. वाळणे गावच्या पलीकडे पोहचला तर कोयनेला पुर आलेला. पोहून कोयना पार केली आणि धावत वाळणे गावातून डोंगराने वरती निघाला, अंधार होता होता बाप पोहचला. बापाला पाहून मुलाच्या डोळ्यातुन अश्रू वाहु लागले आणि मुलगा जागेवरच कोसळला. मुलाने प्राण सोडला. मुलगा सोडून गेला हे पाहून बापाने हंबरडा फोडला. बापाचा जीव तो खुप रडला. शेतात काम करणारे लोक हि रडत होते. तेव्हा ज्या लोकांनी ते शेत केलं होते त्यांनी विचार केला की, खुप लहान वयात या मुलाने आपला प्राण दिला आहे. आणि हे बलिदान वाया जाऊ नये व सूर्य, चंद्र असे पर्यन्त याचे नाव रहावे असे काहीतरी केले पाहिजे.

त्याच वेळेस उत्तेश्वर मंदिराच्या पायथ्याशी एक सुतार दगड कोरून त्यातून नंदीची सुबक मूर्ति बनवत होता. तेव्हा त्याला पाच गावातील लोक बोलले की मूर्ति तू छान बनवित आहेस, पण त्याच नंदीच्या गळ्यामध्ये त्या मरण पवलेल्या मुलाचे चित्र काढावे. सुताराने तात्काळ होकार दिला व नंदीच्या गळ्यामध्ये त्या लहान मुलाचे ढोल वाजवतानाचे छान असे चित्र काढले आहे.. आज हि आपण मंदिरतील मध्यभागी असलेल्या नंदीच्या गळ्यामध्ये हे चित्र पाहू शकता.

श्री उत्वेश्वर माहिती
उत्तेकर व सकपाळ यांचे कुलदैवत असलेल्या श्री उत्तेश्वराच्या यात्रेला अवघे काही दिवस राहिले आहेत. शनिवार ७ जानेवारी २०२३ रोजी श्री उत्वेश्वर यात्रा आरंभ होईल. रविवार ८ जानेवारी २०२३ रोजी पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर पहाटे देवाचा लग्नसोहळा पार पडणार आहे. स्थानिक नागरीकांकडून मंदिराच्या आजू - बाजूचा परिसर स्वच्छ केला जात आहे. तसेच पायवाटा ही दूरुस्त केल्या जात आहेत. यात्रेसाठी मुंबई , पुणे , रायगड आणि रत्नागिरी येथून मोठया प्रमाणात यात्रेसाठी उत्तेकर व त्यांचे नातेवाईक येतात. मंदिराकडे जर तुम्ही मुंबई येथून येत असाल तर, पोलादपुर शहरातुन डाव्याबाजूने एक रस्ता महाबळेश्वर च्या दिशेने येतो त्या रस्त्यांने ( घाटाने ) वरती यावे ..वाडा-कुंभरोशी येथे आल्यावर तेथून ही एक रस्ता श्री उत्तेश्वर मंदिराकडे आला आहे. शिरवली - चतुर्बेट - खरोशी - गावडोशी. ( गावडोशी येथून ही अर्ध्या डोंगरा पर्यन्त रस्ता गेला आहे . ) वाळणे येथून ही तुम्हाला मंदिराकडे जाता येईल पण चालत ...